नवी दिल्ली, 20 ऑगस्ट – दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या कॅम्प ऑफिसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला त्या धक्क्यात होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे बऱ्या आहेत आणि कामावर लक्ष केंद्रित करत आहेत.
रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर लिहिले, “आज सकाळी जनसुनावणी दरम्यान माझ्यावर झालेला हल्ला हा फक्त माझ्यावरच नव्हे, तर दिल्लीच्या सेवेवरील आमच्या संकल्पावर केलेला भ्याड प्रयत्न आहे. काही वेळ मी धक्क्यात होते, पण आता मी बरी आहे. कृपया मला भेटण्यासाठी कोणीही त्रास करू नये. मी लवकरच पुन्हा जनतेत काम करताना दिसेन.”
त्या पुढे म्हणाल्या, “अशा प्रकारचे हल्ले माझ्या आत्मविश्वासाला तडा देऊ शकत नाहीत. उलट मी आणखी ऊर्जा आणि समर्पणाने काम करेन. जनसुनावणी व जनतेच्या समस्यांचे निराकरण पूर्वीप्रमाणेच गांभीर्याने सुरू राहील. तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.”
बुधवारी (दि. 20) सकाळी सिव्हिल लाइन्स येथील कॅम्प ऑफिसमधील ‘जनसुनावणी’ कार्यक्रमादरम्यान आरोपी राजेश भाईजी (रहिवासी राजकोट, गुजरात) याने मुख्यमंत्री गुप्ता यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटनेनंतर डीसीपी उत्तर दिल्लीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.