नवी दिल्ली, १८ ऑगस्ट – राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शाळा आणि महाविद्यालयांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. दिल्ली पब्लिक स्कूल द्वारका याठिकाणी फोनवरून धमकी मिळाल्यानंतर आता दोन शाळा आणि एका कॉलेजला ईमेलद्वारे अशी धमकी पाठवण्यात आली आहे.
धमकीची माहिती मिळताच शाळा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. पोलिस, बॉम्ब पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. दिल्ली अग्निशमन दलाने सांगितले की, आज सकाळी ७:२४ वाजता नियंत्रण कक्षाला ही माहिती देण्यात आली.
यापूर्वीही दिल्लीतील अनेक शाळांना अशाच धमक्या मिळाल्या होत्या. जुलैच्या सुरुवातीला २० हून अधिक शाळांना ईमेलद्वारे धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पश्चिम विहार येथील रिचमंड ग्लोबल स्कूल, द्वारकातील सेंट थॉमस स्कूल, वसंतकुंज येथील वसंत व्हॅली स्कूल, हौज खास येथील मदर्स इंटरनॅशनल स्कूल आणि लोधी इस्टेटमधील सरदार पटेल विद्यालय यांनाही अशा ईमेल धमक्या मिळाल्या होत्या.
गेल्या तीन दिवसांत जवळपास १० शाळा आणि एका महाविद्यालयाला अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.