सोलापूर, 4 मे (हिं.स.)।
न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला पंधरा दिवस झाले. या हायप्रोफाईल केसचा तपास गुन्हे शाखेकडे न देता सदर बझार पोलिसांकडेच ठेवला. त्यास आता पंधरा दिवस उलटले तरी तपासात ठोस असे काहीच हाती लागले नाही, असे समजते.
प्रचंड हुशार, शांत आणि संयमी असलेल्या डॉ. शिरीष यांनी नेमकी आत्महत्या कोणत्या कारणासाठी केली, त्याच्या आत्महत्येस नेमके कोण जबाबदार यासह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी मागणी सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून तसेच सोलापूरकरांमधून होत आहे.
सोलापूराचे वैद्यकीय क्षेत्र हे राज्यात अग्रेसर आहे. या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञाचा मृत्यू अशाप्रकारे होत असेल तर त्याचा सर्वांगाने तपास होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी नाव न छापण्याच्या अटीवर केली आहे.
ज्यांनी हजारो पेशंटचे प्राण वाचविले, शेकडो लोकांना रोजगार दिला, सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राचे नाव एका उंचीवर नेले अशा डॉ. शिरीष यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोणीही असो, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या सोबत आता सर्वसामान्यांमध्येही या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.