कोल्हापूर, 6 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला.
या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, सरपंच विजयराव गुरव, प्रांताधिकारी हरेश सुळ, देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रागिणी खडके यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री संत बाळू मामा देवालयाच्या वतीने विकास आराखडा संदर्भात निवेदन देण्यात आले. दर्शनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी संत बाळूमामांच्या कार्याचा गौरव करत या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कागल बिद्री श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना कॉलेज ग्राउंड येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले.