वर्धा, २२ ऑगस्ट: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे लोकाभिमुख कामे करण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासयोजनांचा आढावा घेतला.
पवार यांनी सांगितले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा विकासाच्या बाबतीत मागे राहू नये. शासन सर्वांना पूर्ण सहकार्य करेल.” त्यांनी सेवाग्राम विकास आराखड्याची कामे गुणवत्तेने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
१५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात वर्धा जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. केंद्राकडून मंजूर झालेल्या २० लाख घरकुलांसाठी जमीन नसल्यास गायरान जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
सेलसूरा येथील कृषी विज्ञान केंद्रास अधिक सक्षम करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याने पायाभूत प्रकल्पांसाठी युनिक आयडी देण्याच्या उत्तम कामाबद्दल जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे कौतुक केले.