छत्रपती संभाजीनगर, ७ ऑगस्ट –
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विकासाचा मार्ग स्वीकारल्याचे प्रतिपादन भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनी केले आहे. शालेय साहित्य वाटपापासून ते शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यापर्यंत शिक्षण अधिक सुरक्षित व सुलभ होण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. मतदारसंघातील २०० हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवून विशेषतः मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही त्यांनी अनेक ठोस पावले उचलली. गेली २० वर्षे बंद असलेला देवगिरी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, लवकरच हा कारखाना कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच, २००२ साली स्थापन झालेली फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे निष्क्रिय होती. मात्र त्यांच्या प्रयत्नांमुळे याठिकाणी प्रथमच कांदा लिलाव प्रक्रिया सुरू झाली. शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क न घेता विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असून बाजार समितीलाही नवसंजीवनी मिळाली आहे.