नवी दिल्ली, 11 जून (हिं.स.) : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे भाऊ आणि माजी खासदार लक्ष्मण सिंह यांची काँग्रेसमधून गच्छंती करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांसाठी लक्ष्मण सिंह यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
राहुल गांधी, रॉबर्ट वड्रा आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावरील लक्ष्मण सिंह यांचे विधान चुकीचे मानले आहे. हे पाहता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा निर्णय घेतला आहे. लक्ष्मण सिंह यांच्या अपमानास्पद टिप्पण्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत असे पक्षाने म्हटले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर लक्ष्मण सिंह यांनी रॉबर्ट वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केले होते.
त्यांनी नमाजवरील रॉबर्ट वाड्रा यांच्या विधानावर भाष्य केले होते. मुस्लिमांना रस्त्यावर नमाज अदा करण्याची परवानगी नाही, म्हणून दहशतवाद्यांनी हल्ला केला या रॉबर्ट वाड्रांच्या विधानावर उत्तर देताना लक्ष्मण सिंह म्हणाले होते की, आम्ही हा बालिशपणा किती काळ सहन करणार आहोत. राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा भोळे आहेत, राहुल गांधींनी काळजीपूर्वक बोलावे, ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी ओमर अब्दुल्ला यांची दहशतवाद्यांशी साठगाठ असल्याचा आरोपही केला होता. आपल्या नेत्यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा असे लक्ष्मण सिंह म्हणाले होते.
——————–