– सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला खडसावले
– पहलगाम हल्ल्यासंदर्भातील जनहित याचिका फेटाळली
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयाने आज, गुरुवारी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचं खच्चीकरण करायचं आहे का ? असे खडेबोल सुनावत परिस्थितीची संवेदनशीलता असूनही बेजबाबदार याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडसावले.
जम्मू-काश्मीरचा रहिवासी मोहम्मद जुनैद, फतेश कुमार साहू आणि विकी कुमार यांनी ही जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली होती. याचिकेत 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारला काश्मीरमधील इतर पर्यटकांचे संरक्षण करण्यासाठी निर्देश देण्याची विनंती केली होती. न्यायमुर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करणाऱ्या वकिलांवर कडक शब्दात टीका करत याचिका फेटाळली.
याचिकाकर्त्याला खडसावताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की, अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. तुमच्या देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. ही वेळ अशी आहे जेव्हा प्रत्येक भारतीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आला आहे. त्यामुळे आमच्या सैन्याचे मनोबल तोडू नका. ही योग्य वेळ नाही आणि या प्रकरणाची संवेदनशीलता पहा. न्यायाधीशांचे काम वादांवर निर्णय घेणे आहे, चौकशी करणे नाही, असेही सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे. आमच्याकडे तपास करण्याचे कौशल्य कधीपासून आले आहे ? तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. ते फक्त निकाल देऊ शकतात. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका,” असं म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले.
तुम्ही करत असलेल्या विनंतीबद्दल तुम्हाला तरी खात्री आहे का ? आधी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगता. ते चौकशी करू शकत नाहीत. मग तुम्ही मार्गदर्शक तत्त्वे, भरपाई आणि नंतर प्रेस कौन्सिलला निर्देश देण्यास सांगता. तुम्ही आम्हाला रात्री या सर्व गोष्टी वाचण्यास भाग पाडत आहात. याचिका मागे घेण्याची परवानगी देताना कोर्टाने याचिकाकर्ता जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची मुभा दिली आहे.
———————-