चंद्रपूर, 24 मार्च (हिं.स.)।
स्वतःची तुलना इतरांशी करू नका, आपल्यासारखा दुसरा कोणीच नाही, आपण जे करू शकतो, तसे दुसरे कोणी करु शकत नाही असे अंगी बाळगा, फॅशन क्षेत्रातील रॅम्प म्हणजे ‘रन वे’ असून येथून विद्यार्थी ‘टेक ऑफ’ घेतील, असा विश्वास प्रख्यात अभिनेत्री ‘नटरंग फेम’ सोनाली कुलकर्णी यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील ”फॅशन डिझाईन” विभागाच्या वतीने महाविद्यालयात ”’होरायझन: द फ्युचर ऑफ स्टाईल २०२५’ हा ”फॅशन शो ”मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी उदघाटन करतांना त्या बोलत होत्या.
सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व.राजेश्वरराव पोटदुखे खुल्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार हे होते, तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, सचिव प्रशांत पोटदुखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार,”फॅशन डिझाईन” विभागप्रमुख डॉ. अनिता वडस्कर- मत्ते हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले की,”डिझायनर” चे काम फक्त डिझायनिंग करणे नसून मार्केटमध्ये लोकांना काय आवडते हे देखील पाहणे जरूरी आहे. तुमच्या मनातील कल्पना साकार करण्यासाठी प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल असे त्यांनी सांगितले.
”फॅशन” संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्नांची गरज अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रतिपादित करीत उपक्रमाबाबत अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. पी.एम. काटकर यांनी यात २०० विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगत हा ”फॅशन शो” ”फॅशन” अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
रंगीबेरंगी प्रकाशझोतात बनविण्यात आलेल्या भव्य ”स्टेज”वरील रॅम्प वर युवक-युवतींनी ”कॅट वॉक” केला. या सोहळ्यात इंडो वेस्टर्न, वेस्टर्न, पारंपारिक, बॉलीवूड इत्यादी विविध पद्धतीच्या ड्रेसमधील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन करून मनोवेधक सादरीकरण केले. यासाठी फॅशन विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव