छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे विजेतेपद देवगिरी महाविद्यालयाने जिंकले. पारितोषिकांसह विजेतेपदाचा चषक या संघाने पटकाविला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला यंदा ’चॅम्पियनशिप’ने हुलकावणी दिली. मात्र पाच गटात मिळून १५ पारितोषिक विद्यापीठाच्या संघाने जिंकली.
देवगिरी महाविद्यालयाने नृत्य, नाटय, संगीत व वाड्ःमय या चार गटातील विजेतेपदासह चॅम्पियनशिप देखील एक वर्षांच्या अंतराने पुन्हा जिंकली. प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर यांचे या संघाने मार्गदर्शन लाभले. गेल्या वर्षीचा विजेता राहिलेला संघ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यंदा मात्र मागे राहिला. तर यजमान विद्यापीठाच्या संघाने विजेतेपद गमावले मात्र पाच गटातील १६ कला प्रकारात सहभाग घेऊन १५ पारितोषिके जिंकली. या संघास संघप्रमुख गौतम सोनवणे, विशाखा शिरवडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर शासकीय कला महाविद्यालयाच्या संघाने ललित कलातील विजेतेपदासह डॉ.दिलीप बडे स्मृति चषकही जिंकला. डॉ.गजानन पेहरकर यांचे मार्गदर्शन संघास लाभले. तर पाथ्री येथील राजषी शाहु महाविद्यालयाने ग्रामीण गटातील विजेतपदाचा चषक जिंकला.