सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली. शिरीष वळसंगकरांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबारात अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनं सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
शिरीष वळसंगकरांनी आत्महत्या का केली, याबाबत आता पोलीस तपास सुरु आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. डॉ. शिरीष वळसंगकर हे अत्यंत प्रसिद्ध न्युरोफिजिशियन होते. त्यांनी केवळ सोलापूरच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभरात आपली वैद्यकीय सेवा दिली. दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णालयात वळसंगकर यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले त्याच रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिरीष वळसंगकर हे रात्री 8 वाजता घरात कुटुंबियांसमवेत जेवण करीत होते. 8.30 वाजता ते अचानक उठले व बाथरूममध्ये गेले. त्यांनी स्वतःच्या बंदुकीने डोक्यात गोळी घातली व ते जमिनीवर पडले. शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव अश्विन हेही डॉक्टर असून त्यांनी प्राथमिक उपचार केले, पण साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच शहरातील मान्यवर तसेच त्यांचे रुग्ण आणि अनेक सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली. हॉस्पिटलमधील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.