सोलापूर, 13 मे (हिं.स.)।विख्यात न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला २५ दिवस लोटले तरी पोलिसांच्या हाती ठोस असे काहीच लागलेले दिसत नाही. दुसरीकडे, तपासाच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी मनीषा यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली असून त्यासाठी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, शेकडो कोटींचे मालक असलेले डॉ. वळसंगकर हे आर्थिक कारणातून आत्महत्या करतील काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. डॉ. वळसंगकर यांच्या घरातील कलहाच्या अनुषंगाने तपास करण्याबाबत पोलिसांनी अद्यापही गांभीर्य दाखवलेले नाही, यामुळे अनेकांनी तपास काम सीआयडीकडे सोपविण्याची मागणी या आधीच केली आहे.गेल्या आठवड्यात सून डॉ. शोनाली यांचे पत्र व्हायरल करण्यात तपास अधिकाऱ्यांनी रस दाखवल्याचे पुढे आले होते. गृहराज्यमंत्री यांच्यासमोर हा गंभीर मुद्दा उपस्थित झाला होता. आता मनीषा यांच्याविरूद्ध रुग्णालयातील आर्थिक व्यवहारासंदर्भातील काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे सांगून पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली आहे.
पोलिस कोठडी मागताना तपास अधिकाऱ्यांना ज्या मुद्द्यांवर तपास करायचा आहे. मनीषाविरुद्ध जे काही पुरावे हाती लागले ते मांडावे लागणार आहेत. पोलिसांनी आपले तपासकाम रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्यापुरतेच मर्यादित केले की गृहकलहाच्या दिशेने काही केले, हेही यावेळी पुढे येणार आहे.