सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।
सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणात सुसाईट नोट सापडली आहे. वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे – माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात तिला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. आत्महत्येपूर्वी वळसंगकर यांनी एक सुसाईट नोटी लिहिली होती. या नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासंदर्भात डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, हॉस्पिटल मधील एका महिला अधिकारी हिने वेळोवेळी सहकार्य करून देखील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर खोटे आरोप करून धमकी दिल्याचे म्हटले आहे.रुग्णालयातील सर्व व्यवहार हे कागदोपत्री हवे होते. यासाठी डॉ. वळसंगकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण, त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला विना कागदोपत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरुन काढले होते. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती.तेव्हापासून डॉक्टर तणावाखाली होते, असे सांगण्यात येत आहे.