पुणे, 15 मे (हिं.स.) भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हॅन्डग्लायडर, हॉटएअर, हॉटएअर बलूनच्या उड्डाणास पोलिस प्रशासनाने बंदी घातली आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील तीस दिवस म्हणजेच १२ जूनपर्यंत ही बंदी असणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दहशतवादी/राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायको-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून त्यांद्वारे हल्ला करू शकतात.
त्यांच्याकडून महत्त्वाची धार्मिक, पर्यटन स्थळे तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करू शकतात. तसेच ते मोठ्या प्रमाणात सार्वजनिक जीवन धोक्यात आणून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतात. त्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत.