मुंबई, 24 जुलै – अनिल अंबानी यांच्याशी संबंधित सुमारे 50 कंपन्यांवर आणि 35 ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी छापेमारी केली आहे. ही कारवाई येस बँक कर्ज घोटाळा व मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात करण्यात आली असून, आर्थिक गैरव्यवहाराची गंभीर माहिती उघड झाली आहे.
येस बँकेचे 3,000 कोटींचे कर्ज शेल कंपन्यांमार्फत वळवले!
ईडीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, 2017 ते 2019 दरम्यान येस बँकेने मंजूर केलेले 3,000 कोटी रुपयांचे कर्ज विविध शेल कंपन्यांकडे आणि समुहातील इतर कंपन्यांकडे वळवण्यात आले. कर्ज वितरण प्रक्रियेत गंभीर त्रुटी, बनावट कागदपत्रे, कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांना कर्ज, आणि नियमबाह्य व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाचखोरी आणि दस्तऐवजातील बनावटपणाचा पर्दाफाश
येस बँकेच्या काही प्रमोटर्स आणि अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे स्पष्ट पुरावे ईडीला मिळाले आहेत. जुन्या तारखेचे कर्ज दस्तऐवज तयार करून, त्यातून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. यामुळे बँकिंग प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
25 व्यक्ती व 50 कंपन्यांची चौकशी सुरू
या प्रकरणात सुमारे 25 व्यक्ती आणि 50 कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत. या कारवाईसाठी ईडीने CBI च्या दोन FIR, तसेच SEBI, नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा, आणि NFRA यांनी दिलेल्या माहितीस आधार घेतला आहे.
रिलायन्स होम फायनान्सलाही चौकशीत ओढले गेले
SEBI कडून सादर करण्यात आलेल्या अहवालात, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL) च्या कॉर्पोरेट कर्जामध्ये एका वर्षात दुप्पट वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कर्ज प्रक्रियेतही अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे सापडले आहेत.