मुंबई, २६ जुलै – रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांवर गेल्या ४८ तासांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई सुरू केली आहे. सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या संशयित कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित ही चौकशी आहे.
🔍 दिल्ली आणि मुंबईतील ३५ ठिकाणी छापे
ईडीने दिल्ली आणि मुंबईतील ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकले असून, हे सर्व ठिकाणे रिलायन्स समूहाच्या कंपन्या आणि अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत. ही कारवाई गुरुवारपासून सुरू असून, शनिवारीही काही ठिकाणी छापेमारी सुरूच होती.
🏢 रिलायन्स पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खुलासा
रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांनी एका निवेदनात स्पष्ट केले की, ईडीची ही कारवाई गटाच्या जुन्या कंपन्यांशी संबंधित आहे, आणि सध्या कार्यरत कंपन्यांचा या चौकशीशी कोणताही संबंध नाही.
💰 फसवणुकीचे आरोप आणि सहकार्य करणाऱ्या संस्था
ईडीकडून सुरू असलेल्या तपासात कर्ज फसवणूक, लाचखोरी आणि सार्वजनिक संस्थांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये नॅशनल हाऊसिंग बँक, सेबी, एनएफआरए आणि बँक ऑफ बडोदा या संस्थांनी काही महत्त्वाची माहिती ईडीसोबत शेअर केली आहे. या माहितीवरून असे दिसून आले आहे की, येस बँकेच्या प्रवर्तकांशी संबंधित संस्थांना कर्ज वितरणाच्या अगोदरच पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
🧾 ईडीकडून येस बँक आणि अंबानी गटातील संबंधांचा तपास
कर्ज मंजुरी आणि निधी हस्तांतरणाच्या प्रक्रियेत लाचखोरी, फसवणूक व लाभार्थ्यांमधील संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, ईडीने आता येस बँकेचे माजी प्रवर्तक आणि अनिल अंबानी यांच्या कंपन्यांमधील संबंधांची सखोल चौकशी सुरू केली आहे.