हैदराबाद, 22 जुलै – ऑनलाइन बेटिंग आणि जुगार अॅप्सच्या जाहिरातीप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या संशयाखाली प्रसिद्ध दक्षिण भारतीय कलाकार राणा दग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मंचू यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने चौकशीसाठी संबंधित कलाकारांना पुढील तारखा दिल्या आहेत – राणा दग्गुबाती यांना 23 जुलै, प्रकाश राज यांना 30 जुलै, विजय देवरकोंडा यांना 6 ऑगस्ट आणि लक्ष्मी मंचू यांना 13 ऑगस्ट रोजी हैदराबाद येथील झोनल कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमएलए (PMLA) म्हणजेच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशी दरम्यान त्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
मार्च 2025 मध्ये तेलंगणा पोलिसांनी 25 सेलिब्रिटी व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सविरोधात एफआयआर नोंदवली होती. त्यांच्यावर सोशल मीडियावर बेकायदेशीर ऑनलाइन सट्टा अॅप्सचा प्रचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी देशातील पाच राज्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, या कलाकारांनी प्रमोट केलेली अॅप्स ऑनलाइन सट्टेबाजी व जुगारामार्फत कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर उलाढाल करत होती. यातील काही कलाकारांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांनी फक्त जाहिराती केल्या असून त्या अॅप्सच्या बेकायदेशीर कामकाजाची माहिती त्यांना नव्हती, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यवहारात सहभागी होण्याचा त्यांचा हेतू नव्हता.
तथापि, ईडी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील चौकशीतून बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या साखळीचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
