बीड : महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी लगावला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला.
महाराष्ट्रात ३० वर्षे बघतोय बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे शरद पवारांनी म्हटले.
शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“राज्यात जे सध्या सुरु आहे ते विरोधकांच्या नैराश्याचं प्रतिक आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केलं असून आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांनी माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका शरद पवारांनी केली आहे.
“महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. लोकांची बांधिलकी ठेवण्याचे काम सरकार करत असून राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं. राज्यात आज जे सरकार आहे त्याला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.
* रावसाहेब दानवेंनाही टोमणा
शरद पवारांना यावेळी रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दावा केल्यासंबंधी विचारण्यात आलं असता दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला त्यांनी लगावला. “रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.