सोलापूर, 29 मे (हिं.स.)।
सोलापूर ते गोवा दरम्यान विमानसेवेचा प्रारंभ ९ जून रोजी होणार आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी सध्या तिकीट बुकिंग सुरू असून साधारणतः एक महिन्यात सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर ते गोवा विमानसेवेतून होटगी रोड विमानतळ वापरात आल्यानंतर या ठिकाणी अन्य मार्गांसाठी नवीन कंपन्या येण्यास अधिक सुलभ होणार आहे.
सोलापुरातून मुंबई, तिरुपती, बंगळूर, हैदराबाद या प्रमुख ठिकाणी विमानसेवा सुरू व्हावी, अशी सोलापुरातील नागरिकांची मागणी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार असून, दुसऱ्या टप्प्यात मुंबई व अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश असणार आहे. मुंबईसाठी साधारणतः महिना अखेरपर्यंत विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सोलापूरच्या विमानसेवेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरत आहे.