रत्नागिरी, 20 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात आठ नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन होणार आहेत. त्यासाठी सरकारी जमिनी नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र या जागांचा शोध सहकार विभागाला घ्यावा लागणार आहे.यापूर्वी जिल्ह्यात एकच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती होती. मात्र शासनाच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एक अशा प्रकारे आठ बाजार समित्या स्थापन होणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी एक तालुका एक बाजार समिती योजनाची घोषणा केली होती. राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने राज्य सरकाने आता प्रत्येक तालुक्यासाठी बाजार समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय अलीकडे प्रसिद्ध केला. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी वगळता अन्य आठ तालुक्यांमध्ये नव्याने कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहेत.