छत्रपती संभाजीनगर, 9 सप्टेंबर : छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा स्थानिक प्रशासनाकडून आढावा घेतला. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर, शिर्डी, अजंठा येथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. अशा सूचना त्यांनी दिल्या शहरातील रस्ते कामाला सुरुवात करण्यासाठी ५ हजार अनधिकृत बांधकामे हटवली, त्यामुळे आगामी काळात शहरात ६० मीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. शहरात पाणीपुरवठा योजनेला गती देण्यात आली असून २६ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले आहे.
२७४० कोटींची योजना सुरू असून २०० एमएलडी पाणी मिळून नियमित पाणीपुरवठा सुरू होईल. शहरातील एसटीपी आणि इटीपी प्रकल्पांना गती दिली असून शहरातील उद्योगांना हे पाणी उपलब्ध करून द्यावे असे निर्देश याप्रसंगी दिले. तसेच महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे निर्देश पालिका आयुक्तांना दिले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यात शाश्वत उत्पन्न देणारी गटशेती करण्याला प्राधान्य द्यावे, तसेच मराठवाड्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून येत्या १५ दिवसात प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असेही निर्देश याप्रसंगी सांगितले. यावेळी सामाजिक न्याय तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रा.रमेश बोरनारे, आमदार अर्जुन खोतकर तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि कृषी, उद्योग, ऊर्जा व इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.