अमरावती, 27 मे, । शिक्षकाने आपल्या सेवेची 12 वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी तर 24 वर्ष सेवा केल्यानंतर निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यावर्षी हे प्रशिक्षण 2 जून ते 12 जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी सर्व अनुभवी शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत पात्र न ठरल्यास गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण करावे लागणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शनमध्ये आहे.
विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात येणारी चाचणी आणि त्याचे गुणदान हा चर्चेचा विषय ठरत आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण चाचणीसाठी शंभर गुण, स्वाध्यायसाठी शंभर गुण, लेखी चाचणीसाठी 50 गुण तर अहवाल लेखनासाठी 50 गुण असे एकूण 300 गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यमापन होणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान व नंतर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेत किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे. अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याचप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणे अपेक्षित आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण 2020,राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण,सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणासह ताण तनावाचे व्यवस्थापन मूल्यमापन,कृती संशोधन आदि वीस ते बावीस विषयांचा समावेश राहणार आहे.
प्रशिक्षण काळात दर ताशीकेनंतर दहा गुणांच्या चाचणीसह दहा स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे. यातील पाच स्वाध्याय प्रत्यक्षात प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकांवर आधारित स्वाध्याय राहणार आहे. उर्वरित पाच स्वाध्याय प्रशिक्षणानंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे. संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यावर शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे. यात रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, टिपा लिहा, लघुत्तरी, उपयोजनात्मक व मुकत्तोतरी प्रश्नांचा समावेश राहणार आहे.
शिक्षकी सेवेत रुजू झाल्यानंतर असलेली परिस्थिती व त्यानंतर झालेले अनेक बदल यासाठी शिक्षकांनी सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम व्हावे याकरिता या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. राज्यस्तरीय प्रशिक्षण एस सी आय आर टी पुणे येथे पार पडले. विभाग स्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून 2025 या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देणार आहेत.