मॉस्को, १६ ऑगस्ट – रशियातील रियाझान प्रांतातील एका दारुगोळा कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून १३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार रशियन सैनिकांचाही समावेश आहे. आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट मॉस्कोपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या लेस्नोय गावातील इलॅस्टिक सिंथेटिक फायबर कारखान्यात झाला.
कारखान्यातील दारुगोळ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागल्याने सलग अनेक स्फोट झाले. मंत्रालयाने सोशल मीडियावर कारखान्याचे अवशेष आणि मोठ्या प्रमाणातील नुकसानीचे फोटो शेअर करत घटनेची पुष्टी केली. जखमींच्या उपचारासाठी स्थानिक रुग्णालयांत व्यवस्था करण्यात आली असून, घटनेची चौकशी सुरू आहे.
रियाझान प्रांताचे गव्हर्नर पावेल मालकोव यांनी एक दिवसाचा शोक जाहीर करत प्रदेशभर झेंडे अर्ध्यावर उतरवले जातील, असे सांगितले. हा कारखाना दारुगोळा आणि सिंथेटिक फायबर उत्पादनासाठी प्रसिद्ध असून ऑक्टोबर २०२१ नंतर येथे झालेला हा दुसरा मोठा प्राणघातक स्फोट आहे. त्या वेळी १७ जणांचा मृत्यू झाला होता.
काही वृत्तांनुसार, ही आग लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यानंतर लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली.