न्यूयॉर्क : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत (हेट स्पीच) नरमाईची भूमिका घेतल्याचा आरोप झाल्यानंतर फेसबुकने अमेरिकन वृत्तपत्रात स्पष्टीकरण दिले आहे. राजकीय पक्ष किंवा राजकारण न पाहता आमची कंपनी आपले धोरण लागू करते, असे फेसबुकने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने कालच फेसबुकने भारतातील भाजप नेते आणि संबंधित काही पेजेसवर कारवाई करण्यास नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून, फेसबुकच्या भूमिकेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘फेसबुक हेट स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकाखाली ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर फेसबुकने अखेर खुलासा केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आम्ही कोणचेही राजकीय वजन वा पक्षांशी संबंधाचा विचार न करता हिंसेला चिथावणी देणारी द्वेषयुक्त भाषण आणि लिखाणाला प्रतिबंधित करतो. जागतिक पातळीवर हेच धोरण अंमलात आणतो. आम्ही अचूकता व चांगुलपणा यांची निश्चितता करण्यासाठी या अंमलबजावणी संदर्भात प्रगतीवर आहोत आणि नियमितपणे या प्रक्रियेची आढावा घेत असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
“आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील” असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
* काय आहे प्रकरण ?
प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात फेसबुकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक पोस्टवर कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.
भारतात या प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी फेसबुक आणि भाजपला फैलावर घेतलं आहे. फेसबुकने द्वेषपूर्ण भाषण आणि पोस्टसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना फाटा देऊन भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई करणे टाळले. ही कारवाई करण्याला फेसबुक इंडियाच्या एका उच्च पदाधिकाऱ्यानेच विरोध केल्याचंही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या अहवालात म्हटलं आहे.
संबंधित फेसबुक पदाधिकाऱ्याने व्यावसायिक हितसंबंधाचे कारण सांगत भाजपशी संबंधित जवळपास चौघांशिवाय काही ग्रुपवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. फेसबुक इंडियाच्या पब्लिक डायरेक्टर अनखी दास यांनी भाजप नेत्यावरील कारवाईमुळे भारतातील फेसबुकच्या बिझनेसला नुकसान होईल, असं सांगितल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
* राहुल गांधींचाही निशाणा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला होता. भाजप आणि आरएसएस भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचे नियंत्रण करतात. त्यांनी त्या माध्यमातून बनावट बातम्या आणि द्वेष पसरविला. तसेच याचा वापर ते मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करत आहेत. राहुल गांधींनी एका अहवालाचा हवाला देत भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट केले की, ‘भारतात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर भाजपा आणि आरएसएने कब्जा केला आरोप केला आहे.
* भारत फेसबुकचं सर्वात मोठं मार्केट
यूझर्सचा विचार करता भारत हे फेसबुकसाठी सर्वात मोठं मार्केट आहे. भारतात फेसबुकचे सर्वाधिक 346 मिलियन यूझर्स आहेत. त्यामुळेच फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण पोस्टवर कारवाई करणं टाळलं, असा आरोप होत आहे. अनखी दास यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावरील कारवाई टाळून पक्षपातीपणा केल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
* भडकाऊ पोस्ट हटवल्या
भाजपचे काही नेते समाज माध्यमातून विशेषत: फेसबुकवरून समाज भावना भडकेल अशी पोस्ट शेअर करतात. मात्र फेसबुककडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. आक्षेपार्ह वक्तव्य फेसबुक हटविते, मात्र भाजपशी लागेबांधे असल्याने फेसबुक भाजप नेत्यांच्या आक्षेपार्ह पोस्ट हटवित नाही असे आरोप झाल्यानंतर अखेर फेसबुकने कार्यवाही केली असून भाजप नेते टी. राजा सिंह आणि आनंद हेगडे यांच्या काही पोस्ट हटवल्या आहेत.