अमरावती, 3 मे (हिं.स.)
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट बनवून काहींना पैसे मागण्यात आल्याची धक्कादायक बाब येथे उघड झाली. सायबर पोलिसांनी बनावट अकाउंट बनविणाऱ्या भामट्याची ओळख पटविली असून, तो राजस्थानचा असल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे.
राजस्थानच्या त्या सायबर भामट्याने सीपींच्या नावाने बनावट अकाउंट बनवून शहरातील काहींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तथा चॅटिंग करून काहींना रक्कमदेखील मागितली. त्यातील काहींना सीपींशी संपर्क करून शहानिशा केली असता, हा तोतयेगिरीचा प्रकार उघड झाला. सुत्रानुसार, ३० एप्रिल रोजी शहरातील चार ते पाच व्यक्तींना त्या बनावट अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्या, तर काहींना मेसेज आले आहेत. काहींनी प्रत्युत्तरात फाइन सर, असा प्रतिसाद दिल्याने आरोपीने काहींना मोबाइल नंबर मागितले. त्या भामट्याने स्वतःला सीपी नवीनचंद्र रेड्डी असे संबोधत आपल्या सीआरपीएफमधील संतोषकुमार नामक मित्राची बदली झाल्याने त्याला घरातील फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन विकायची असल्याची बतावणी केली. काहींना शंका आल्याने त्यांनी ती बाब सीपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या कानावर घातली. सीपींनी तत्काळ सायबर पोलिसांना सुचित केले.
सोशल मीडियावर अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट तयार करून त्या माध्यमातून ऑनलाइन फसवणूक केली जाते. तसाच प्रकार दोन दिवसांपूर्वी माझ्या नावाने उघड झाला. आरोपी राजस्थानचा असल्याचे समोर आले आहे.नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त.
—————