जळगाव, 22 जुलै – इंदूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील करत होते. मात्र, आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी आमदार पाटील यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर मुक्ताईनगर शहरात बंद पाळण्यात आला.
ही घटना खामखेडा पुलाजवळ मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजता घडली. आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दुपारी दीड वाजता मुक्ताईनगर बंद करण्यात आला आणि दोन वाजेच्या सुमारास शहर संपूर्णपणे बंद झालं.
मुक्ताईनगर तालुक्यातील इंदूर–हैद्राबाद महामार्गाचं काम सुरू असून, शेतजमिनींच्या मोबदल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आहे. याआधीही रविवारी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळीही पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलन थांबवलं होतं.
मंगळवारी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरनाड फाट्यावर महामार्गाचं काम बंद पाडलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुष्णत पिंगळे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी कारवाई करावी लागली.
आंदोलनादरम्यान आमदार पाटील यांच्यासह सुमारे ६० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण असून शेतकऱ्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
