वाशिम, 4 जुलै (हिं.स.)। समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असताना गुरुवारी (३ जुलै) रात्री आणखी एक भीषण अपघात झाला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या चालक चेतन हेलगे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातात राधेश्याम जैसवाल (६७), माधुरी जैसवाल (५२), वैदही जैसवाल (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता जैसवाल (५५) यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होत महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक पट्ट्यांना जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .
दरम्यान, या अपघातामागे चालकाला डुलकी आल्याचा किंवा अतिवेगाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमरेड परिसरात शोककळा पसरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांनी समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे, तसेच प्रशासनानेही उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.