नांदेड, २६ ऑगस्ट। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात एका पित्याने स्वतःच्या मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा प्राण घेऊन त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. इज्जतीच्या नावाखाली केलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.
गोळेगाव येथे १९ वर्षीय विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला मुलीच्या वडिलांनी विहिरीत फेकून हत्या केल्याचा आरोप आहे. विहिरीतून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तिच्या प्रियकराचा मृतदेह शोधण्याची कारवाई सुरू आहे.
या भीषण घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की संजीवणी कमळे (१९) या मुलीचा विवाह गेल्या वर्षी गोळेगावमधील सुधाकर कमळे यांच्याशी झाला होता. मात्र विवाहापूर्वीपासून तिचे लखन भंडारे (१९) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही दोघांमध्ये फोनद्वारे संपर्क चालू होता.
सोमवारी जेव्हा मुलीचे सासरचे लोक घराबाहेर गेले होते, तेव्हा तिने आपल्या प्रियकराला घरी बोलावले. अचानक त्यांच्या सासरच्यांनी परतल्यावर दोघांना एकत्र पकडले. यानंतर मुलीच्या पतीने तिच्या वडिलांना फोन करून तिला घरी नेण्यास सांगितले.
मुलीचे वडील मारोती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेजण तिच्या सासरी पोहोचले. आरोप आहे की यांनी दोघांनाही दोरीने बांधून रस्त्यातील एका विहिरीत फेकून दिले ज्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
हत्याकांडानंतर आरोपी पिता स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून तिच्या प्रियकराचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींविरुद्ध कारवाई सुरू केली आहे.