सोलापूर/प्रतिनिधी जिल्ह्यात रब्बी हंगामाची सुगी आता जवळजवळ संपली आहे.शेताची नांगरणी, कुळवणी करून पेरणीपूर्व तयारी करण्याच्या नादात काहीजण आहेत. तर आपल्या जिल्हा कृषी विभागालाही आता आगामी खरीप हंगामाचे वेध लागले असून, त्यांनी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठी यंदा तब्बल २ लाख ३२ हजार ३५६ मे.टन इतके खत मागविले आहे. तर हे खत गतवर्षीच्या तुलनेत १२ हजार मे. टनाने अधिक असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून मिळाली. २०२३ व २०२४ या दोन वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरिपात रासायनिक खत वापर कमी केल्याने खतांची टंचाई जाणवली नाही. मात्र गतवर्षी पाऊसकाळ मुबलक झाल्यानेआता खतांची मागणी वाढू लागल्याने खतांची तयारी सोलापूर कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
खरिपासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंत पुरेल इतक्या खताचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये युरिया-९७ हजार १९४ मे. टन, डिएपी २३ हजार ५०२ मे. टन, एमओपी ७ हजार ९६० मे. टन, एनपीके ७५ हजार ८०० मे. टन तर सिंगल सुपर फॉस्फेट २७ हजार ९०० मे. टन आदींचा समावेश आहे. खताची मागणी वाढली तरी शासन स्तरावरुन अजून खत मिळू शकते. यामुळे शेतकरी बांधवांनी आगामी खरीप हंगामासाठी खते मिळतील का नाही? याची चिंता करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.
*आगामी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी जिल्हा कृषी विभागाने खतांचे मुबलक नियोजन केले आहे. शासनाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता घरचेच सोयाबीन बियाणे वापरू लागल्याने बियाणांचा तुटवडा जाणवणार नाही. पेरणीसाठी घरगुती सोयाबीन बियाणे गतवर्षी वापर वाढल्याने महाबीज आणि इतर काही खाजगी कंपन्यांचे जिल्ह्यातील बियाणे ३० टक्के शिल्लक राहिले होते. आगामी वर्षातही मराठवाड्याच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही घरगुती सोयाबीन बियाणे वापरावे.- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.