बँकॉक, 26 जुलै – थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद चिघळत असून, मुआंग जिल्ह्यातील बान चामराक परिसरात तिसऱ्या दिवशीही लष्करी संघर्ष सुरू आहे. शनिवारी पहाटेपासून दोन्ही देशांदरम्यान जोरदार गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू आहे.
थायलंडच्या त्राट मरीन टास्क फोर्सच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५:१० वाजता कंबोडियन सैन्याने थाई हद्दीत तीन ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर थाई नौदलाने (रॉयल थाई नेव्ही) प्रत्युत्तर देत ५:४० वाजता कंबोडियन सैन्याला मागे हुसकावून लावले.
सीमाभागात रात्रीच्या अंधारात तोफांचा मारा
बँथट पर्वत परिसरात पहाटे ५ वाजता तोफखान्याचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तांबोन नोएन साई येथील राय पा मंदिरातील एका भिक्षूने पर्वताच्या माथ्यावर आगीच्या ज्वाळा पाहिल्याचे सांगितले. घटनास्थळी तातडीने थाई सैन्याने कारवाई करत सुरक्षा वाढवली. कंबोडियाच्या कोह काँगपासून अवघ्या ११ किमी अंतरावर असलेल्या ख्लोंग याई परिसरात सैनिकी चौक्या उभारण्यात आल्या आहेत.
दोन्ही देशांत मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढतोय
गुरुवारी सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत थायलंडने १९ मृतांची नोंद केली आहे, त्यामध्ये ६ सैनिकांचा समावेश आहे. ६० हून अधिक नागरिक आणि सैन्य कर्मचारी जखमी झाले आहेत. कंबोडियाने देखील १३ मृतांची पुष्टी केली आहे.
यूएनमध्ये तक्रार, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत थायलंडचे राजदूत चेरदचाई चायवाविद यांनी शुक्रवारी सांगितले की, जुलैच्या मध्यापासून दोन वेळा थाई क्षेत्रात भूसुरुंग पेरले गेले, ज्यामुळे थाई सैनिक जखमी झाले. यासंदर्भात त्यांनी कंबोडियावर थेट आरोप केला. मात्र, कंबोडियाने हे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांना निराधार ठरवले आहे.
तणाव निवळण्याची चिन्हं नाहीत
सीमारेषेवरील हा संघर्ष दोन्ही देशांच्या नाजूक संबंधांवर गहिरा परिणाम करत असून, तणाव निवळण्याची कोणतीही ठोस चिन्हं अद्याप दिसून आलेली नाहीत. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि सीमाभागात युद्धजन्य स्थिती कायम आहे.
