सोलापूर – मुरारजी पेठेतील मंगळवेढेकर चाळीत एका २५ दिवसीय मुलाचा पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून खून केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अनोळखी इसमाला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काल बुधवारी सकाळी मंगळवेढेकर चाळीतील प्रतीक्षा संकेत सुरवसे यांचा २५दिवसाचा बाळाचा मृतदेह घराशेजारील पाण्याच्या ड्रममध्ये तरंगताना आढळून आला होता.
शवविच्छेदनानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्याप्रमाणे सरकारतर्फे महिला फौजदार अश्विनी काळे यांनी फौजदार चावडी पोलिसात अनोळखी आरोपीविरुद्ध फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.
लकी चौकातील रोडगे-मंगळवेढेकर चाळ येथे राहणाऱ्या – संकेत सुरवसे यांच्या २५ दिवसीय मुलाचा मृतदेह घराबाहेरच्या पाण्याच्या ड्रममध्ये आढळून आला. ही घटना काल बुधवारी (ता. १०) सकाळी उघडकीस आली होती. या ठिकाणी नागरिकांनी हळहळ करीत मोठी गर्दी केली होती. मुलाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे लगेचच स्पष्ट झालं नाही. फौजदार चावडी पोलीस याचा तपास घेत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंगळवेढेकर चाळ येथे राहणाऱ्या संकेत सुरवसे यांच्या पत्नीनं एका मुलास जन्म दिला. या दांपत्याला आधी एक वर्षाचा मुलगा आहे. संकेत है पत्नी, दोन मुलं आणि आईसह या ठिकाणी राहतात. काल रात्री संकेत हे नोकरीसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांची वृद्ध आई आणि पत्नी तसेच दोन लहान मुलं होते. २५ दिवसाचं बालक आईच्या कुशीत झोपलं होतं. बुधवारी सकाळी वडील संकेत घरी आला तेंव्हा मुलगा पाळण्यात दिसला नाही.
त्यांनी पत्नीकडे चौकशी केली, मुलाचा शोध सर्वांनीच सुरु केला. काही वेळातच पाण्याच्या ड्रममध्ये मुलगा मृतावस्थेत तरंगताना आढळून आला. ही घटना समजताच चाळकरी आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ करीत सुरवसेंच्या घराकडे धाव घेतली. पोलीसांनाही पाचारण करण्यात आलं. शववाहिकेतून मृतदेह सिव्हिलकडे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज आला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी घरातील संकेत, त्यांची पत्नी, आई अशा सर्वांची कसुन चौकशी सुरु केलीय. काल आकस्मित मयत अशी नोंद सिव्हिल पोलीसात झाली होती. बंद दाराआड लहान बालक आईच्या कुशीत झोपलं असताना ड्रमपर्यंत पोहचलं कसं या विषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे. आज अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
