सोलापूर : पुण्याच्या पुरुष व महिला संघानी वरिष्ठ गटाच्या ५७व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांची लढत अनुक्रमे मुंबई उपनगर व ठाण्याशी होईल.
वेळापूरच्या पालखी मैदानावर रविवारी रात्री झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या पुण्याने उस्मानाबादला १५-१३ असे १.५० मिनिटे राखून नमविले. मध्यंतराची ७-५ ही तीन गुणाची आघाडीच पुण्यास विजय मिळवून दिली. अष्टपैलू खेळी करणारे प्रियंका इंगळे (२.३०,२.३० मिनीटे व ५ गुण), ऋतिका राठोड (१.२० व ४ गुण) व स्नेहल जाधव (१.५०,१.३० व ३ गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
उस्मानाबादच्या किरण शिंदे (२.१०), गौरी शिंदे (१.२०व ६ गुण) व जान्हवी पेठे (१.४०,१.१० मिनिटे व २ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले. दुसऱ्या सामन्यात ठाण्याने रत्नागिरीस १४-११ असे हरविले. त्यांच्या रेश्मा राठोड हीने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत संरक्षणात ३.०० व १.०० मिनिटे पळती केली. त्यामुळेच त्यांना ७-४ अशी आघाडी मिळाली.
रुपाली बडे (२.००, १.२० मिनिटे) व गीतांजली नरसाळ (२.००,१.००) यांनी शानदार संरक्षण करीत संघाचा विजय सुकर केला. रत्नागिरीच्या अपेक्षा सुतार (२.००,१.४० मिनिटे व ३ गुण) व आरती कांबळे (२.३०,२.३०) यांनी कडवी लढत दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुरुष गटात पुण्याची सांगलीस २२-१८ असे नमविताना चांगलीच दमछाक झाली. पुण्याच्या मिलिंद कुरूपेने ८ व सागर लेंग्रेने ४ गडी बाद करीत अनुक्रमे १.२० व १.३० मिनिटे पळती केल्यामुळे त्यांना मध्यंतरास १२-८ अशी आघाडी मिळाली. अष्टपैलू खेळ करणाऱ्या सांगलीच्या अरुण गुणकी (१.४०,१.४० मिनिटे व ५ गुण) व वसुरज लांडे (१.००,१.३० मिनिटे व ३ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरला ठाण्यास १९-१८ असा १.३० मिनिटे राखून नमविताना कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. निहार दुवळे (६ गडी), ओंकार सोनवणे (१.५०,१.०० मिनिटे) व अक्षय भांगरे (१.२०व ३ गुण) यांनी मध्यंतरास १०-८ अशी आघाडी मिळवून दिली. ठाण्याच्या गजानन शेंगाळ (१.२०,१.१० मिनिटे व २ गुण) यांनी लढत दिली. जितेश म्हसकर, संकेत कदम व शुभम उत्तेकर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद करीत त्याला साथ दिली.
खो खो चे आधारस्तंभ शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस खो खो दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने हा दिन वेळापूर येथे केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक आणि संघटकांचा सत्कार वेळापूर येथे सुरू असलेल्या राज्य खो खो स्पर्धेचे अध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव जे. पी. शेळके आदी उपस्थित होते.