अमरावती, 9 जुलै (हिं.स.) अचलपूर शहराच्या औद्योगिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या फिनले मिलला गत काही वर्षांपासून अंधाराच्या खाईत लोटले गेले आहे. एकेकाळी हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी ही मिल आज शेकडो कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न बनला आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून बंद असलेल्या फिनले मिलमुळे सुमारे ८०० ते ९०० रोजंदारी कामगार आर्थिक अडचणीत सापडले असून, ३१ महिन्यांचा थकीत पगार मिळालेला नाही. परिणामी, या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या गंभीर परिस्थितीचा स्थायी तोडगा काढण्यासाठी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी पुढाकार घेतला. ७ जुलै रोजी अचलपूरच्या शिष्टमंडळाने थेट दिल्ली गाठली आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी उद्योग मंत्रालयात महत्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेत दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याबाबत गांभीयनि नोंद घेत सकारात्मक आश्वासन दिले. ही बैठक म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे, तर अचलपूरच्या कामगारांच्या न्यायासाठीचा निर्णायक टप्पा होता.
या शिष्टमंडळातील आमदार प्रवीण भाऊ तायडे यांचे कार्य केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता, त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मंत्रालयात ठोस भूमिका मांडली. या संघर्षशील नेतृत्वामुळेच आज अचलपूरमध्ये नव्या आशेचा किरण दिसत आहे. फिनले मिल पुन्हा सुरू होण्यासाठी फक्त सरकार किंवा प्रतिनिधींचे प्रयत्न पुरेसे नाहीत. अचलपूरच्या प्रत्येक नागरिकाचा पाठिंबा हिच खरी ताकद ठरेल. हे आंदोलन केवळ पगारासाठी नव्हे, तर पुन्हा उभ्या राहणाऱ्या जुडवा नगरीसाठी वरदान आहे.
