कोलकाता, 18 ऑगस्ट – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटावरून वाद आणखी गडद झाला आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाल मुखर्जी उर्फ गोपाल पठा यांच्या नातू संताना मुखर्जी यांनी त्यांच्या आजोबांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण झाल्याचा आरोप करत नवीन एफआयआर दाखल केला आहे.
संताना मुखर्जी यांनी सांगितले की, गोपाल मुखर्जी हे अनुशीलन समितीचे सदस्य व कुस्तीपटू होते. १९४६ च्या दंगलीदरम्यान मुस्लिम लीगच्या हिंसाचारापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शस्त्रे उचलली होती. मात्र कुटुंबाची परवानगी न घेता त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटात वापरली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात मुर्शिदाबाद आणि कोलकाता येथे देखील चित्रपटाविरोधात एफआयआर दाखल झाले होते. या चित्रपटात संवेदनशील दृश्ये असू शकतात ज्यामुळे राज्यातील सांप्रदायिक सौहार्द बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणी अंतरिम स्थगिती दिली होती. ‘द बंगाल फाइल्स’ हा अग्निहोत्रींच्या ‘फाइल्स’ ट्रायलॉजीमधील तिसरा चित्रपट असून, यापूर्वी ‘द ताश्कंद फाइल्स’ (२०१९) आणि ‘द काश्मीर फाइल्स’ (२०२२) प्रदर्शित झाले होते.