नवी दिल्ली, 6 सप्टेंबर। देशभरात सलग मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांमध्ये आपत्तीच सावट पाहायला मिळत आहे. पंजाबमध्येही अतिवृष्टीचे परिणाम भयानक स्वरूपाचे आहेत. राज्यातील २३ जिल्ह्यांमधील तब्बल १९०० गावे पुरामुळे पूर्णपणे बुडाली असून आतापर्यंत ३.८४ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. अमृतसरला सर्वाधिक फटका बसला असून आतापर्यंत १२ जिल्ह्यांमध्ये ४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १.७२ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आणि स्थानिकांची परिस्थिती गंभीर आहे.
दिल्लीमध्ये यमुना नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत असून, शहरातील सिव्हिल लाईन्ससह मठ बाजार, यमुना बाजार, वासुदेव घाट, निगम बोध घाट, मयूर विहार आणि काश्मिरी गेटसारख्या भागात पाणी भरले आहे. विशेषतः सिव्हिल लाईन्समधील स्वामीनारायण मंदिर संकुलात ५ फूटांपर्यंत पाणी भरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात यमुना नदीचे पाणी निवासी भागात शिरले आहे. यमुना धोक्याच्या चिन्हापेक्षा ५५ सेमी वर वाहत असून, शहरातील २० हून अधिक वसाहती पाण्याखाली आल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग आणि सिंथन रोड बंद आहेत. यामुळे ३७०० हून अधिक वाहनं अडकल्याची माहिती आहे. श्रीनगर व बडगाम परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच माता वैष्णोदेवी यात्रेला सलग ११ दिवसांपासून स्थगित ठेवण्यात आले आहे, जे २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भूस्खलनामुळे सुरु आहे.
इतर राज्यांतही पावसाचे संकट जारी आहे. हरियाणामध्ये फरीदाबादमधील यमुना, सिरसामधील घग्गर, कुरुक्षेत्रातील मार्कंडा आणि अंबालामधील टांगरी नदी पूर्णपणे भरून वाहत असून, हथिनीकुंड बॅरेजवरील पाण्याची पातळी १ लाख क्युसेकच्या धोक्याच्या पातळीच्या खाली आली आहे.
मध्य प्रदेशात राजगड परिसरात कालीसिंध नदीच्या पुलावरून कार कोसळली असून, सरांगपूर जिल्हा परिषद सदस्य महेश सोनी यांचा मुलगा विशाल सोनी (२६) या अपघातात अडकला आहे. बचावकार्य सुरू आहे.
गुजरातमधील सुरत व वडोदरा जिल्ह्यातही पाण्याची पातळी वाढत असून नर्मदा आणि किम नद्यांच्या पाण्यामुळे पुराचा धोका वाढला आहे. प्रशासनाने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
हिमाचल प्रदेशात शिमला-किन्नौर राष्ट्रीय महामार्गावरील जुरी येथे मोठा दगड रस्त्यावर पडल्यामुळे वाहनधारक मोठ्या धोक्यात आले आहेत. आपत्तीग्रस्त कुल्लूच्या सैंज खोऱ्यात लष्कराच्या एम-१७ हेलिकॉप्टरने तातडीने अन्न धान्य पोहोचवले आहे.
सदर संकटामुळे राज्य व केंद्र शासनांच्या पातळीवर तातडीचे उपाययोजना सुरु असून प्रशासन आणि स्थानिक प्रशासनांनी नागरिकांना सुरक्षिततेचे उपाय अवलंबण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.