मुंबई, 22 एप्रिल (हिं.स.)।
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस सैरभैर झाली आहे. त्यांचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्या भारताची बदनामी करतात, निवडणूक आयोगावर आरोप करतात. काँग्रेसने आपले मूळ विचार सोडून दिले असून आता काँग्रेसचे राजकारण हे चापलुसीचे आहे तर भाजपाचे विकासाचे राजकारण आहे, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. बावनकुळे बोलत होते.
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खा. धनंजय महाडिक, माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत, आ. राहुल कुल, आ. योगेश टिळेकर, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. बावनकुळे यांनी भाजपाला संग्राम थोपटेसारखा कोहीनूर हिरा लाभला आहे अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांचे पक्षात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देण्यासाठी श्री. थोपटे यांनी प्रवेश केल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचे मंत्रीपद अनेक वर्षे भूषवलेल्या अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम हे भोर चे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि अनुभव यामुळे भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचून पुणे जिल्ह्यात भाजपाला बळ मिळेल असा विश्वासही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला.
जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटणारा, जमीनी स्तरावर धडाडीने काम करणारा नेता संग्राम थोपटे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्ष संघनेला ताकद मिळेल असा विश्वास कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि ज्या विश्वासाने तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली.
मतदारसंघातील विकासकामांना गती द्यायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपाच ते करू शकतो ही खात्री पटल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे श्री. थोपटे म्हणाले.
कोणत्याही पदासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी आपण दुप्पट ताकदीने भाजपा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करू असा शब्द श्री. थोपटे यांनी दिला. काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ पक्षानेच आपल्यावर आणली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
श्री. थोपटे यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये भोर, राजगड, मुळशीचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, नाना राऊत, गंगाराम मानेरे, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, महिला काँग्रेस अध्यक्ष गितांजली शेटे, किरण काळभोर, राजगड सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव सुके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदराव आंबवले, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक शिवाजीराव बुचडे, निर्मलाताई आवारे, शोभाताई जाधव, स्वरुपाताई थोपटे यांसह अनेकांचा समावेश आहे.