इस्लामाबाद, ७ जून, (हिं.स.) – पाकिस्तानचे माजी खासदार (सिनेटर) अब्बास अफरीदी यांचे आज निधन झाले. ते शुक्रवारी कोहाटच्या आजम बाग भागात गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खारियन येथील सीएमएच बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अब्बास अफरीदी यांच्या निधनानंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. देशातील अनेक नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांची अंत्ययात्रा कोहाटमधील बाबरी बंदा येथून निघणार आहे.
अब्बास अफरीदी मार्च २००९ मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून पाकिस्तानच्या सिनेटसाठी निवडून आले होते. नंतर १९ मार्च २०१४ रोजी त्यांना वस्त्रोद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ देण्यात आली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली.
२०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) च्या तिकिटावरून एनए-३२ कोहाट मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना ४४,१५४ मते मिळाली, मात्र पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे उमेदवार शहरयार अफरीदी यांनी त्यांचा पराभव केला. २०२४ च्या निवडणुकीतही त्यांनी एनए-३५ कोहाट येथून पुन्हा पीएमएल-एनचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला.