लिमा, 17 एप्रिल (हिं.स.)।पेरूचे माजी अध्यक्ष हुमाला आणि त्यांची पत्नी नादीने हेरेदिया यांना मनी लाँडरींगच्या आरोपात स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवले असून या दोघांनाही प्रत्येकी १५ वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
हुमाला आणि त्यांच्या पत्नी हेरेदिया यांनी २००६ आणि २०११ मधील आपल्या निवडणूक प्रचारासाठी ओडेब्राश्ट कंपनी आणि व्हेनेझुएलात १९९९ ते २०१३ या काळात सत्तेवर असलेले तत्कालिन अध्यक्ष हुगो चावेझ यांच्या सरकारकडून लक्षावधी डॉलरची बेकायदेशीर देणगी मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याचे निरीक्षण पेरुतल्या नॅशनल सुपीरियर कोर्टाने नोंदवले आहे.
हुमाला आणि त्यांच्या पत्नी विरोधातल्या तपासाला २०१५ मध्ये सुरुवात झाली होती. मात्र प्रत्यक्ष खटल्याला २०२२ मध्ये सुरुवात झाली. न्यायालयाने या दोघांव्यतिरिक्त अन्य ८ जणांना दोषी ठरवले आहे. हुमाला आणि हेरेदिया हे देशाबाहेर पळून जाउ नयेत म्हणून २०१७ ते २०१८ दरम्यान ताब्यात घेण्यात आले होते.
हुमाला यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे गेल्या दोन दशकात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झालेले ते देशातील तिसरे माजी अध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या पुर्वी अलेजांद्रो ततोलेदो यांना देखील ओडेब्राश्ट कंपनीशी संबंधित गुन्ह्याप्रकरणी २०२४ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अल्बेर्टो फुजिमोन यांना भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या विविध प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.