नाशिक, 11 जून (हिं.स.)। मुंबई-मनमाड- बिजवासन पेट्रोलियम पाईपलाईनला छिद्र करुन पेट्रोल व डिझेल चोरी करणार्या टोळीचा मनमाड पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, मुंबई-मनमाड-बिजवासन अशी २४३ कि.मी.ची पेट्रोल व डिझेलची पाईनलाईन टाकण्यात आली आहे. मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनकवाडे शिवारात या पाईपलाईनला क्लॅम्प बसवून छिद्र करुन पेट्रोल व डिझेल चोरी होत असल्याची तक्रार पानेवाडी येथील बीपीसीएलचे प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांनी मनमाड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास मनमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे हे आपल्या पथकासह करत असताना त्यांनी गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची नावे निष्पन्न केली.
याप्रकरणी मनमाड पोलिसांनी सुनिल उर्फ सोनू जयशंकर तिवारी (वय ३५, रा. काका ढाब्याजवळ, कल्याण), कथूरायन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (वय ३८, रा. म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई) यांना काकासाहेब शिवराम गरूड यांच्या अनकवडे शिवारातील पोल्ट्रीफार्मजवळून शिताफिने ताब्यात घेतले. नंतर महंमद मकसूद अब्दुल वाहिद शेख (वय ४०, रा. मदरसा स्कूल, शिवाजीनगर, गोवंडी मुंबई) याला मुंबई येथून ताब्यात घेतले. तसेच इरफान याकूब मोमीन (रा. इंडियन हायस्कूलजवळ, जमधाडे चौक, मनमाड) व काकासाहेब शिवराम गरूड (रा. अनकवाडे, ता. नांदगाव) यांना मनमाड येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एकूण ८ आरोपी सहभागी असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. वाहीद सदार सय्यद (रा. नटवर पारखे कम्पाऊंड, घाटकोपर लिंकरोड, गोवंडी, मुंबई), याकूब शेख व अमजद कुरेशी (रा. मुंबई) यांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
अटक आरोपींपैकी सुनिल तिवारीवर यापूर्वी २ गुन्हे दाखल असून, इरफान मोमीनवर मनमाड व निफाड पोलीस ठाण्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी आतापर्यंत नेमके किती पेट्रोल व डिझेल चोरले आणि ते कोणास विकले व त्याची वाहतूक कशी केली, याबाबत स्पष्टता आलेली नसून, त्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.