अमरावती, 16 ऑगस्ट – शेतकरी व शेती केंद्रबिंदू मानून राज्य सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांची जोपासना करत समाजातील प्रत्येक घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, ॲड. निलेश हेलोंडे पाटील, राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, आयजी रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, कृषी क्षेत्र राज्यासाठी महत्त्वाचे असल्याने बियाणे, खते, पिककर्ज आदी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी ८८ हजार शेतकऱ्यांना १,२५० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून ८५ हजार शेतकऱ्यांच्या १.३२ लाख हेक्टर पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. तसेच पिकांच्या नुकसानीपोटी ६४२ कोटी रुपयांचा निधी ४ लाख शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी व आधार बँक खात्याशी जोडणे, तसेच ई-पिक पाहणी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ अंतर्गत केवळ अमरावती जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ दरम्यान २३१ रुग्णांना २.२० कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचे भुसे यांनी नमूद केले. तसेच विस्थापित सिंधी समाजाला जमिनीच्या मालकीहक्कासाठी पट्टे वाटपाचा पहिला कार्यक्रम जिल्ह्यात पार पडल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी २९० कोटींची तरतूद करून २४५ कोटी रुपयांचे पुरस्कार वाटप होणार आहे. शिक्षण क्षेत्रात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकविणे, तसेच सीबीएसई माध्यमातून मराठी अनिवार्य करण्याचे निर्णय राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत २ कोटी वृक्षलागवडही करण्यात आली आहे.
सोहळ्यात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अनुकंपा धोरणांतर्गत ज्योती अमोल चव्हाण यांना कोतवाल पदावर प्रथम नियुक्ती देण्यात आल्याबद्दल त्यांचा मंत्र्यांच्या हस्ते गौरव झाला.