नांदेड, 20 ऑगस्ट – नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
राज्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावांत पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. जनावरांचे प्रचंड नुकसान झाले असून पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच शेतजमिनीवरची पिकेही पाण्याखाली गेली आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी हसनाळ गावात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच मारजवाडी या पुनर्वसित गावालाही भेट दिली.
या पाहणी दौऱ्यात आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्यासह शेतकरी व नागरिक उपस्थित होते. आमदार डॉ. राठोड यांनी पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती मंत्री महाजन यांना दिली.
