मुंबई, 17 एप्रिल (हिं.स.)।मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) २१.७८ कोटी रुपयांचे कोकेन तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गिनी महिलेला अटक केली आहे.
डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटच्या पथकाने केनियाची राजधानी नैरोबीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या गिनी नागरिकत्व असलेल्या एका महिला प्रवाशाला विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी तपासणी दरम्यान, चेक-इन केलेल्या सामानात पांढऱ्या रंगाच्या पावडरचे तीन पॅकेट्स लपवलेली आढळली.त्यानंतर एनडीपीएस फील्ड टेस्ट किट वापरून तपासणी केल्यानंतर या पदार्थात कोकेन असल्याचे आढळून आले.
चौकशी नंतर, डीआरआयने अंमली पदार्थाचे पॅकेट जप्त केले.जप्त केलेल्या प्रतिबंधित पदार्थाचे एकूण प्रमाण 2,178 ग्रॅम होते, ज्याचे आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य अंदाजे 21.78 कोटी रुपये आहे. देशात ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार महिला प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.