नवी दिल्ली, 4 जुलै (हिं.स.)। भारतीय बुद्धिबळाची नवी आशा डी. गुकेशने पुन्हा एकदा जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. ग्रँड चेस टूरच्या सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ क्रोएशिया स्पर्धेत १८ वर्षीय गुकेशने जगातील क्रमांक १ चा खेळाडू मॅग्नस कार्लसनला रॅपिड प्रकारात मात देत दिली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कार्लसनने गुकेशला “संभाव्यतः कमकुवत खेळाडूंपैकी एक” असे म्हणत कमी लेखले होते. पण याच वक्तव्याला गुकेशने खेळपट्टीवर ठाम आणि प्रभावी उत्तर दिलं आहे.
गुकेशने काळ्या सोंगट्यांनी खेळत ४९ चालींमध्ये कार्लसनला नमवलं. ही त्यांच्या कारकिर्दीतील कार्लसन विरुद्धची सलग दुसरी मात ठरली. या विजयामुळे गुकेशने सहा फेऱ्यांतून १० गुण मिळवत गुणतालिकेत आघाडी घेतली आहे.
कार्लसनने इंग्लिश ओपनिंगने खेळाची सुरुवात केली होती. एक क्षण असा वाटला की तो वरचढ ठरत आहे, पण गुकेशने 26…d5 ही धारदार चाल खेळून सामन्याची दिशा पलटली. कार्लसनचा बचाव फिसकटला आणि अखेर त्याला हार पत्करावी लागली.
या विजयानंतर माजी विश्वविजेते गॅरी कास्पारोव्ह यांनी म्हटलं, “ही केवळ एक हार नाही, तर ठाम आणि प्रभावी हार आहे. गुकेशने केवळ चुका पकडल्या नाहीत—तो अधिक चांगला खेळला. आता आपण मॅग्नसच्या वर्चस्वावर प्रश्न उपस्थित करू शकतो.”
गुकेशसाठी हा दिवस विलक्षण होता. पहिल्या फेरीत पोलंडच्या जान-क्रिज़्टोफ़ डूडा विरोधात पराभव पत्करल्यानंतर त्याने अलीरेजा फिरोजा, आर. प्रज्ञानंद आणि आता कार्लसनला पराभूत करत सलग तीन विजय नोंदवले.
गुकेशने विजयानंतर सांगितलं, “पहिल्या फेरीतील पराभवानंतर मी फारसा निराश झालो नव्हतो. डूडाने चांगला खेळ केला. मी पुढील डावांवर लक्ष केंद्रित केलं.”
६ फेऱ्यांनंतरची गुणस्थिती (रॅपिड विभाग)
डी. गुकेश (भारत) – 10 गुण, डूडा जान-क्रिज़्टोफ़ (पोलंड) – 8 गुण, वेस्ली सो (अमेरिका) – 7 गुण, इव्हान सारिक (क्रोएशिया), मॅग्नस कार्लसन (नॉर्वे), अनीश गिरी (नेदरलँड्स) – प्रत्येकी 6 गुण, फॅबियानो कारुआना (अमेरिका), आर. प्रज्ञानंद (भारत) – प्रत्येकी 5 गुण, अलीरेजा फिरोजा (फ्रान्स) – 4 गुण, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव (उझबेकिस्तान) – 3 गुण