अबूजा, 20 ऑगस्ट – उत्तर नायजेरियातील कटसीना राज्यातील मालुमफशी परिसरात नमाजाच्या वेळी मशिदीवर झालेल्या गोळीबारात किमान २७ जण ठार तर अनेकजण जखमी झाले आहेत. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, उंगुवान मंतौ या गावात मुस्लीम समुदाय नमाजासाठी मशिदीत एकत्र जमला असताना सशस्त्र गुंडांनी अचानक हल्ला चढवला आणि अंधाधुंद गोळीबार केला.
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तथापि, नायजेरियाच्या उत्तर-पश्चिम आणि उत्तर-मध्य भागांत जमिनी व पाण्यावरील वादातून मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यातील संघर्षामुळे अशा घटना वारंवार घडतात. गेल्या काही वर्षांत या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
कटसीनाचे आयुक्त नासिर मुअज़ू यांनी सांगितले की, रक्तपातानंतर पुढील हल्ले टाळण्यासाठी उंगुवान मंतौ भागात लष्कर आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यांनी नमूद केले की, पावसाळ्यात हल्लेखोर अनेकदा पिकांमध्ये लपून समुदायांवर अचानक हल्ला करतात.
