काशी, अयोध्या, त्रिवेणी संगमावर केले पुण्यस्नान
लखनऊ, 10 जुलै (हिं.स.) : गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आज, गुरुवारी अयोध्या, बनारस, हरिद्वार,प्रयागराज इत्यादी तीर्थस्थळी भाविकांनी मंगल स्नानासाठी मोठी गर्दी केली होती.
भाविकांनी स्नान, पूजा आणि गुरु वंदना याद्वारे आपली भक्ती व्यक्त केली.
यावेळी अयोध्येत गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप भव्य आणि ऐतिहासिक होता. पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून शरयू नदीच्या पवित्र घाटांवर भाविकांनी गर्दी केली होती. महिला, पुरुष आणि मुलांनी पारंपारिक रीतीरिवाजांनी स्नान केले. त्यानंतर, भाविक मठ आणि मंदिरांमध्ये पोहोचून त्यांच्या गुरूंचे दर्शन आणि आशीर्वाद घेताना दिसले. हर हर महादेव आणि जय गुरु देव यांचे जयघोष सर्वत्र निनादत होते. यासोबतच प्रयागराजमध्येही गुरुपौर्णिमेला त्रिवेणी संगमात भाविकांची गर्दी जमली होती. देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक त्रिवेणी संगमात स्नान करून पुण्यलाभ घेतला.
स्नान केल्यानंतर लोक दान देऊन मठ, मंदिरात दर्शनासाठी गेलेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराजमध्येही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. घाटांवर पोलिस आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.अयोध्या आणि प्रयागराज व्यतिरिक्त, वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी जमली होती. गंगेची पाण्याची पातळी सतत वाढत असली आणि घाटाच्या पायऱ्या बुडाल्या असल्या तरी, भाविकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. लोक सुरक्षित ठिकाणाहून गंगेत स्नान करत होते. अनेक भाविक पाण्यात उभे राहून सूर्याला अर्घ्य अर्पण करताना आणि गंगेच्या पाण्याने पूजा करताना दिसले. प्रशासनाने येथेही व्यापक सुरक्षा व्यवस्था केली होती. एनडीआरएफ आणि पोलिस पथकेही तैनात होती. बनारसमध्ये स्नान केल्यानंतर भाविक बाबा विश्वनाथांच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.