सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
राज्य शासनाने महाराष्ट्रात गुटखाबंदी केली असली तरी बंदी असलेल्या गुटख्यासह सुगंधित पानमसाला, तंबाखू याची दिवसाढवळ्या स्टॉल, टपर्या अगदी काही किराणा दुकानातूनही विक्री होते. इतकेच नव्हे तर उत्पादनावर संबंधित माहिती असणे गरजेचे असते. मात्र, उत्पादक, नोंदणी आदींचा उल्लेख नसलेल्या गुटख्याचीही सर्रास विक्री होत आहे. एकूणच सर्व नियम धाब्यावर बसवून उघडपणे गुटख्याची शहरात विक्री होते आहे.
कायद्याने बंदी असलेला गुटखा, सुगंधी पानमसाला तंबाखू हा अनेक किराणा दुकानातही उघडपणे विकला जातो. गुटख्यावर कारवाईची जबाबदारी अन्न प्रशासन विभागासह पोलिसांची आहे. मात्र, या गुटखा विक्रीविरोधी लोकप्रतिनिधी, राजकारणी यांनीदेखील आवाज उठवणे गरजेचे आहे. शहरासह ग्रामीण भागातून गुटखा विक्री, तस्करी, उत्पादन व साठवणूक सर्रास सुरू आहे. काही प्रमाणात होणारी कारवाई ही दिखावा असल्याचा आरोप काही सुज्ञ नागरिक करत आहेत.
मध्यंतरी अन्न-औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली. पण, ही कारवाई काही दिवसांपुरतीच होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुटख्यासाठी वापरल्या जाणार्या सुगंधी पानमसाला व डबल झिरो तंबाखूची विक्री होते. त्याचे उत्पादन हे मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आदी राज्यात केले जाते. तशी माहिती त्या पाऊचवर असते. पण याच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.