छत्रपती संभाजीनगर, 24 जुलै – सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील 35 वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आर्थिक अडचणींमुळे मृत्यूला कवटाळल्याची दुःखद घटना घडली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे १.४० कोटी रुपये बिले तब्बल वर्षभरापासून प्रलंबित होती. शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे उसनवारीने उभारलेली रक्कम फेडणे अशक्य झाल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
या प्रकरणावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “ही आत्महत्या नव्हे, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनास्थेमुळे झालेला थेट खून आहे. भाजपने ज्या योजनांच्या नावावर मते मागितली, त्या योजनाच आता लोकांच्या जीवावर उठत आहेत.”
दानवे यांनी पुढे म्हटले की, “जर सरकारकडे निधी नाही, तर अशा योजना राबवण्याचा उपयोग काय? आता तरी हर्षल पाटलांचे बिले अदा करून त्यांच्या कुटुंबाला दिलासा द्यावा. माणुसकी म्हणून तरी सरकारने पावले उचलावी.”
आपल्या ट्विटद्वारे त्यांनी कंत्राटदारांना असे टोकाचे निर्णय न घेण्याचे आवाहनही केले आहे. “अशा संकटांचा सामना एकत्रितपणे करूया, पण जीव देण्यासारखे निर्णय घेवू नयेत,” असे त्यांनी नमूद केले.
