नवी दिल्ली, 14 ऑगस्ट – द्वेषाची आग फक्त विनाश करते, त्यामुळे आपली एकता, प्रेम आणि मानवता यांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त ट्विटर (एक्स) वर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मोदी म्हणाले की, 1947 च्या विभाजनाने देशाच्या भौगोलिक सीमांसोबतच लाखो लोकांच्या मनांचे तुकडे केले. अनेकांनी आपले घर, आप्तजन आणि ओळख गमावली. रक्ताने माखलेले रेल्वे ट्रॅक, मृतदेहांनी भरलेल्या गाड्या आणि अश्रूंनी भरलेले चेहरे हे मानव इतिहासातील अत्यंत भयावह दृश्य ठरले.
ही वेदनादायी घटना लक्षात ठेवण्यासाठी आणि पुढील पिढ्यांना सावध करण्यासाठी, 14 ऑगस्ट हा “विभाजन विभीषिका स्मृती दिवस” म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा दिवस द्वेषाच्या विनाशकारी परिणामांची आठवण करून देतो आणि एकता, प्रेम व मानवतेच्या संरक्षणाची प्रेरणा देतो.
पंतप्रधानांनी या दिवशी अनगिनत लोकांनी सहन केलेल्या हालअपेष्टा आणि त्यांचे धैर्य स्मरणात ठेवत, सौहार्द आणि ऐक्याच्या बंधांना अधिक बळकटी देण्याचे आवाहन केले.