डोंबिवली, 26 मे (हिं.स.)। कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर पार्किंग फलक हटवण्यात यावे आणि फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले.
पूर्व -पश्चिम विभागातील रस्त्यावरती पार्किंगची बोर्ड लावले तर गाड्या पार्किंग होणार मग फेरीवाले जाणार कुठे? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड वरील पार्किंग फलक पी वन, पी टू ची अधिसूचना सन २०१७ रद्द झाली पाहिजे. ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावल्यास आमचा विरोध नाही. पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन अधिनियम २०१४ फेरीवाल्याच्या असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी लावून धरल्या. अधिकृत फेरीवाल्यांचे रक्षणकर्ते व्हा भक्षणकर्ते बनू नका असा नाराही दिला. पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना आज (सोमवार २६ मे) फेरीवाला जागतिक दिवस आहे याची आठवणही मोर्चाच्या शिष्टमंडळाने करून दिली.
दरम्यान ह प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत.यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनामध्ये विष्णुनगर पोलीस ठणेतर्फे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
याच मुद्यावर मागे म्हणजे दि.१६ मे २०२५ रोजी इंदिरा गांधी चौक डोंबिवली पूर्व येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते . आज ह प्रभागक्षेत्र कार्यालयावर धरणे आंदोलन पुढे सात दिवसांत योग्य न्याय प्रशासनांने दिला नाही तर पुढील आंदोलन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर करणार असेही जाहीर केले.
सदर मोर्चात अमोल केंद्रे , बबन कांबळे, दिपक भालेराव, अभयलाल दुबे, राजू गुप्ता, काळुबाई गायकवाड, राकेश सिंग, लवजारी गुप्ता या शिष्टमंडळच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाले सहभागी झाले होते.