सोलापूर, 11 मे (हिं.स.)।
हे सरकार आल्यापासून संपूर्ण आरोग्य यंत्रणा ठप्प झाली आहे. ग्रामीण रुग्णालयात वॉर्डबॉय नाहीत, सफाई कामगार नसल्याने अस्वच्छता आहे. सोलापूरच्या सिव्हिलची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही, त्यापेक्षा ही आरोग्य सेवाच बंद करण्यासाठी वरिष्ठांना कळवा, काही दिवसांनी रुग्णांच्या नातेवाइकांनाच तुम्हीच आता शवविच्छेदन करा असे सांगतील, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला खा शिंदे यांनी अचानक भेट दिली. त्यावेळी हे चित्र पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी उपचारासाठी दाखल असलेल्या महिला रुग्णांनी बाथरूमची व्यवस्था नाही, आहे त्यात पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे मोठी दुर्गंधी येते, पिण्याचे पाणी बाहेरून विकत आणावे लागते, जलशुद्धीकरण यंत्रणा आहे परंतु तीही गंज लागलेल्या अवस्थेत आहे, अशा तक्रारी खा. शिंदे यांच्याकडे केल्या.
सर्व रुग्णालयात विद्युत पुरवठ्याच्या वायर लोंबकळत आहेत, एखाद्या रुग्णाला इलेक्ट्रिक शॉक बसला तर, त्याला जबाबदार कोण ? अशी विचारणा उपस्थित डॉक्टरांना केली.